Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पवार-संभाजीराजेंच्या बैठकीनंतरही मराठा आरक्षण संघर्ष समिती आंदोलनावर ठाम

कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चेचा सूर आळवला असताना मराठा संघर्ष समिती मात्र या चर्चेवर समाधानी नाही. तिनं आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे.

बसून काहीच मिळणार नाही

खासदार संभाजीराजे व पवार यांच्यात बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी बैठकीवर आम्ही समाधानी नाही, असा इशारा दिला आहे घरात बसलो तर काहीच मिळणार नाही, याची आम्हाला खात्री झाली आहे.

त्यामुळे जोपर्यंत काही मिळत नाही, तोपर्यंत चर्चांना अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा आरक्षणासाठीच्या रस्त्यावरच्या लढाईवर आपण ठाम असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं

मागच्या मागण्या कागदावरच

मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीने १२ मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यापैकी ८ मागण्या मान्य केल्याचं सांगून गेल्या वर्षी राज्य सरकारने आमचं आंदोलन थांबवलं; मात्र यातील एक ही मागणी अद्याप पूर्ण केली नाही.

आंदोलन करायला लागलो तर सरकार पोकळ आश्वासन देऊन पानं पुसण्याचं काम करतं. त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाची धार वाढवली जाणार नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही आणि हा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

सरकारकडून जातीय तेढ

राज्यातील आघाडी सरकार विश्वासघातानं आलं आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात जातीय तेढ कशी निर्माण होईल, असं वातावरण तयार केलं जात आहे.

ओबीसींचं आरक्षण घालवलं. मराठ्यांचं आरक्षण घालवलं. केवळ तारखांवर तारखा घेतल्या, अशी टीका त्यांनी केली.

25 तारखेला मुंबईत गोलमेज परिषद

येत्या 25 तारखेला मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. या गोलमेज परिषदेला माजी मुख्यमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनाही परिषदेला आमंत्रित केलं जाणार आहे, असं सांगतानाच प्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच केंद्राविरोधात आंदोलन करावं लागलं तर तेही करू, पण सध्या प्रश्न राज्याचा आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

Leave a comment