पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात ५४५ पानांचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २९ तारखेला सुनावणी होणार आहे.

विलेपार्ले भूखंड घोटाळा

विलेपार्ले भूखंड घोटाळा प्रकरणातील फिर्यादी वसुंधरा डोंगरे यांच्या वकिलांना काही कागदपत्रे सादर करायची असल्याने त्यांनी न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितली होती.

Advertisement

त्यानुसार डोंगरे यांचे वकील ॲड जगदीश शिंगाडे यांनी ५४५ पानी पुरावे सादर केले आहेत. परांजपे बिल्डर यांनी कशा प्रकारे लोकांची फसवणूक केली आहे, याबाबत पुरावे न्यायालयापुढे सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.

तथ्य शोधण्याचा प्रयत्न

डोंगरे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसून त्यांना विनाकारण जुन्याच प्रकरणात गुंतवून तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्रास दिला जातो, असे परांजपे यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी सांगितले होते.

त्यानुसार आरोपात असलेले तथ्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न डोंगरे कुटुंबीयांकडून केला जात आहे.

Advertisement

विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे यांनी केला आहे.

त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांना पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले होते.

आरोपींची कार्यपद्धती होणार उघड

‘आम्ही आज पुण्यातील परांजपे बिल्डर विरुद्धच्या विलेपार्ले पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दिंडोशी न्यायालयात फिर्यादी यांच्या वतीने हस्तक्षेप अर्ज व त्यांचे म्हणणे मांडले आहे.

Advertisement

त्याच्या पहिल्या ४५ पानांत फिर्यादीने अनेक गोष्टींचा उलगडा करत आरोपींची विविध प्रकरणातील कार्यपद्धती दर्शविणारी कागदपत्रे पुरावा म्हणून जोडली आहेत.

ज्यात एकूण १०६ दस्त म्हणजे सुमारे साडेपाचशे पानांचा समावेश असून याप्रकरणी पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे.

 

Advertisement