शिवसेना-भाजपत सध्या दररोज आरोप-प्रत्याराोप होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्त्वावरून भाजपवर टीकेचे प्रहार केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आणि ईडीची कारवाई सुरू असलेल्या शिवसेनेचे आमदारांनी भाजपशी जुळवून घेण्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविल्याने राज्यातील चारही राजकीय पक्षांतून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

साद-पडसाद

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे यांना लिहिलेले पत्र समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अजूनही उत्तम संबंध आहेत. ते तुटण्याआधी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, अशी मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सरनाईक यांच्या भूमिकेवर सर्वच पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पक्षाने या निमित्ताने संधी साधत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला साद घातली असताना खा. संजय राऊत यांनी मात्र भाजपवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.

Advertisement

जुळवून घेण्याबाबत वरिष्ठ करतील विचार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत मांडले. सरनाईक हे शिवसेनेचे नेते, आमदार आहेत. त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना, उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली.

उद्धव यांनी त्यावर विचार केला, तर आमचे वरिष्ठ नेतेही त्याबाबत विचार करतील,’ असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मौैन

सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याबाबत काहीच भाष्य केले नाही. ’तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्‍न आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास

खासदार राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ’एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखे काय आहे? ते पत्र खरे असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे.

महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतेय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा शोध घेणे गरजेचे आहे’, असे राऊत यांनी म्हटले आहे.

 

Advertisement