file photo

अमरावती : फोन टॅपिंग प्रकरणी गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांची अगोदरच राज्य सरकारने चाैकशी सुरू केली असताना

आता त्यांच्यासह अमरावती जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. हरी बालाजी एन. यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलांत खळबळ उडाली आहे.

पदाचा दुरुपयोग

कॉल टॅपिंग (इंटरसेप्शन) करण्याच्या साधनांचा गैरवापर करून फोन टॅप करणे तसेच आपल्या पदाचा दुरुपयोग करून खोटी चौकशी लावणे, तपास अधिकाऱ्यावर दबाव टाकणे,

वैयक्तिक जीवनातील गोपनीयता भंग करणे अशा प्रकारचे गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. शहर पोलिस आयुक्तालयातील उच्चश्रेणी लघुलेखक देवानंद भोजे यांनी ही तक्रार केली आहे.

सदर तक्रार १८ जून रोजी नोंदविण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध थेट तक्रार असल्याने या संदर्भात पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती गाडगेनगरचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.

गंभीर आरोप

भोजे हे पूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांचे लघुलेखक म्हणून कार्यरत होते. गैरअर्जदार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला,

अमरावती ग्रामीण स्टेनो टायपिस्ट जगदीश देशमुख, पोलिस शिपाई रूपेश पाटील, कार्यालय अधीक्षक किशोर शेंडे यांच्या नावाचा तक्रारीत समावेश असून त्यात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.

आरोप धादांत खोटे

कॉल टॅपिंग (इंटरसेप्शन) करण्याच्या साधनांचा गैरवापर केल्याच्या तक्रारीतील या प्रकरणात माझ्यावर लावण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत, असे – डॉ. हरी बालाजी एन यांनी सांगितले.