लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना निर्बंधातून सुटका?

‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे.

त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांशी चर्चा करू,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

तिस-या लाटेमुळे मोकळीक नाही

करोनाची दुसरी लाट ओसरली असल्यानं आता संपूर्ण लॉकडाउन कधी उठणार याकडं राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

मात्र, तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तडकाफडकी कुठलीही मोकळीक देण्यास तयार नाही.

त्यामुळं लॉकडाउन उठवण्याचे वेगवेगळे पर्याय पुढं येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

का उठविले जात नाहीत निर्बंध ?

टाळेबंदीला आता जनता पुरती कंटाळली आहे. अनेक ठिकाणी मुक्तपणे वावरता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी लोकल बंद असल्याने हजारो लोकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. छोट्या उद्योगधंदेही ठप्प आहेत.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचेही मोठं नुकसान होत आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर टाळेबंदी हळूहळू उठेल, अशी आशा होती; मात्र तीही फोल ठरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने सरकारने पूर्ण टाळेबंदी उठवणे टाळले आहे.

बेफिकिरी योग्य नाही

‘प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. काही जणांना वाटतं पुढचे १०० ते १२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळं या दिवसांत कोरोना नियमांचं काटेकोर पालन व्हायला हवं.

अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसतात, अशी बेफिकिरी योग्य नाही,’ असं ते म्हणाले.