गेल्या सात महिन्यांत एक-दोन नव्हे तर ५२५ जणांना चांगल्या नोकरीसाठीचा ‘शॉर्टकट’ महागात पडला असून, सायबर गुन्हेगारांनी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे.

संगणक अभियंत्याला पाच लाखांना गंडा

संगणक अभियंता असलेल्या एकाला ई-मेलवर अचानक एक मेल आला, ‘परदेशात राहण्यासाठी घर, चांगल्या पगाराची नोकरी अन् प्रवासासाठी कार’. त्यानेही त्या ई-मेलला तत्काळ प्रतिसाद दिला.

काही दिवसांतच त्याच्याकडून प्रक्रिया शुल्क, विमान प्रवास, निवासासाठी ऑनलाइन पाच लाख रुपये घेण्यात आले, तरीही पैशांची मागणी सुरूच होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

Advertisement

असा करतात गुन्हा….

कोरोनामुळे एकीकडे रोजगार गेलेले, व्यवसायही बंद पडले. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तरुणांकडून नोकरी मिळण्यासाठी धडपड केली जाते. नेमक्या अशाच तरुण-तरुणींना सायबर गुन्हेगार सावज ठरवितात.

इंटरनेटवर उपलब्ध नोकरीसंबंधीच्या वेब पोर्टलवर आपली इत्यंभूत माहिती भरून तरुण-तरुणी मोकळे होतात. सायबर गुन्हेगार तिथूनच संबंधित माहिती घेऊन बनावट कंपन्या, बनावट ई-मेल आयडी तयार करून तरुणांना नोकरीचे मेल पाठवितात.

तरुण आपल्या जाळ्यात अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याकडून शेवटपर्यंत पैसे उकळण्यावर भर देतात. पैसे देण्यास नकार दिल्यास पोलिसात गुन्हे दाखल करण्याची, जीवे मारण्याची धमकी देतात. अशा प्रकारांना घाबरून तरुण त्याकडे दुर्लक्ष करतात.

Advertisement

तपासासाठी स्वतंत्र पथके

पुणे सायबर पोलिसांकडे मागील सात महिन्यात या गुन्ह्यांशी संबंधित ५२५ तक्रार अर्ज आले आहेत. या अर्जांची दखल घेऊन पोलिस स्वतंत्र पथके तयार करून तपास करतात.

नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर तत्काळ प्रतिसाद दिल्यास त्यांची गेलेली रक्कम परत मिळण्याची चिन्हे असतात. त्यासाठी सायबर पोलिसांकडून प्रयत्न केले जातात.

पोलिसांनी केले कॉल सेंटर उद्ध्वस्त

नोकरीविषयक फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी १५ दिवस दिल्लीत मुक्काम ठोकला होता. त्यामध्येच पोलिसांनी दिल्लीत ‘जॉब फ्रॉड’साठी कॉल सेंटरवर छापा टाकून कॉल सेंटर उद्ध्वस्त केले.

Advertisement

तेथून चौघांना बेड्या ठोकल्या. नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रकार त्यांच्याकडून सुरू होता.

 

Advertisement