पेगॅससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे; मात्र चर्चा फक्त भारताचीच केली जात आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूनं हे सगळं केलं जात आहे.
एक-दोन मीडिया हाऊसला चीनी फंडिग येत आहे. त्याद्वारे एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अधिवेशन चालू न देण्यासाठी खटाटोप
पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारातून सर्वधर्म आणि सर्व गटांना प्रतिनिधित्व दिलं. सरकार चांगलं काम करीत असताना या सरकारच्या कामात खोडा घालायचा.
अधिवेशन चालू द्यायचे नाही, यासाठी एक-दोन मीडिया हाऊसेसला हाताशी धरून बदनामी केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
माध्यमांच्या वृत्ताच्या आधारे विरोधकांचा गोंधळ
विरोधी पक्ष माध्यमांतील वृत्तांच्या आधारे अधिवेशनच होऊ द्यायला तयार नाहीत. काही मीडिया हाऊसेसनी पेगॅससच्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी यादी दिली; परंतु या बातम्यांना कोणताही आधार नाही. पुरावे नाहीत.
भारत सरकारची कोणतीही संस्था अशा पद्धतीचं हॅकिंग करत नाही. टेलिग्राफ कायद्यानुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरज नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
संबंधित विभागानं अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणा-यांना नोटिसा दिल्या आहेत. तपासानंतर लवकरच सत्य बाहेर येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
डाॅ. मनमोहन सिंग यांच्या काळातही फोन टॅपिंग
डाॅ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचा आरोप झाला होता. तेव्हा उत्तर देताना सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केल्याचं सांगितलं होतं.
इतकंच नाही तर जे काम झालं आहे ते कायदेशीर झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॉड्रिंग रोखण्यासाठी केल्याचं सांगितलं होतं.
तसंच ते योग्य असल्याचं समर्थनही केलं होतं. त्याचबरोबर फोन टॅपिंगची बातमी येणं चुकीचं असल्याचं सांगत, याबाबत यापुढे काळजी घेऊ असंही ते म्हणाले होते, असे फडणवीस यांनी निदर्शनास आणले.