विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या नात्याची उकल केली आहे. आमचं नातं बहीण-भावाचं असून अजूनही हे नातं टिकून असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पंकजांबाबत फडणवीस काय म्हणाले ?
मी गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत घडलो. मुंडे कुटुंबाशी माझं भावनिक नातं आहे. आजही ते नातं कायम आहे. त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. हे नातं राजकारणापलिकडचं आहे.
त्यात काहीच कमी अधिक होत नाही. आम्ही पूर्वी बहीण-भावाप्रमाणे महाराष्ट्रात फिरायचो. आजही आमचं हे नातं कायम आहे, असं फडणवीस म्हणाले.
बेबनावच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधान
विशेष म्हणजे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. त्यातही पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
त्यामुळेही फडणवीसांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. पंकजा यांनी वरळीत त्यांच्या घरासमोर समर्थकांशी संबोधताना दिल्लीतील नेत्यांची नाव घेतली होती.
दिल्लीतील नेते आपले नेते असल्याचं म्हटलं होतं; पण महाराष्ट्रातील भाजपच्या एकाही नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. किंबहुना फडणवीसांचं नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे राज्यातील नेतृत्वावर पंकजा नाराज असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवारांशी नाते कसे ?
पंकजा यांच्या पाठोपाठ अजित पवारांशी कसे नाते आहे, याचे उत्तरही फडणवीस यांनी दिलं आहे. फडणवीस आणि अजितदादांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने या दोघांनी एकमेकांविषयी वृत्तपत्रात लेख लिहिला होता.
त्यामुळे त्यांना दोघांच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस यांनी मोठ्या खुबीने उत्तर दिलं. प्रश्न नात्याचा नाही. आम्हा दोघांना एकमेकांविषयी लेख लिहिण्यास वृत्तपत्राने सांगितलं होतं. अजितदादा इतके वर्षे राजकारणात आहेत.
त्यामुळे त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. त्यांच्या कामाची विशिष्ट शैली आहे. त्यांचं राज्यासाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख होता. त्यापलिकडे पाहण्याची गरज नाही, असं सांगून फडणवीस यांनी थेट भाष्य करणं टाळलं.
अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात का?
या मुलाखतीत फडणवीसांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला. तुमचा वाढदिवस जुलैमधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसही जुलैमधला आणि अजितदादांचा वाढदिवसही याच महिन्यातला आहे.
त्यामुळे जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? अजितदादा मुख्यमंत्री होतील का? असा सवाल त्यांना करण्यात आला.
यावर हा प्रश्न तुम्ही अजितदादांनाच विचारला तर बरं होईल, असं सांगत त्यांनी हा प्रश्न टोलवून लावला. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदापेक्षाही राज्यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत, असंही ते म्हणाले.