Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राजकीय संन्यास घेण्याच्या विधानावर फडणवीसांचे घूमजाव

सत्ता द्या. चार महिन्यांत ओबीसींना आरक्षण दिले नाही, तर राजकीय संन्यास घेण्याची भाषा करणा-या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता फडणवीस यांनी आपल्या विधानापासून फारकत घेतली आहे.

आता सारवासारव

फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनात राजकीय संन्यास घेण्याबाबत एक विधान केलं होतं.

त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी फडणवीसांना जोरदार टोलेही लगावले होते. तोच मुद्दा आज पत्रकारांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

त्या वेळी पुढील 25 वर्षे तरी राजकारणात राहणार असल्याचं सांगत फडणवीस यांनी आपल्या राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर सारवासारव केली.

फडणवीसांवर तोंडसुख

26 जून रोजी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपनं राज्यव्यापी आंदोलन पुकारलं होतं. त्या वेळी नागपुरात बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं; पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.

फडणवीसांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी तोंडसुख घेतलं.

त्यावर आज फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनीही या मुद्द्यावरुन फडणवीसांना छेडलं. त्या वेळी आपण पुढील 25 वर्षे तरी राजकारण आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“या पुढे मी २५ वर्षे राजकारण करणार आहे. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, ती विचारपूर्वक बोलतो. मलाही माहीत आहे, की संन्यास घ्यायची गरजच पडणार नाही.

कारण जे करण्यासारखं आहे ते हे लोक करतच नाही. विचारपूर्वक बोललो. जे करता येण्यासारखं आहे ते करत नाही म्हणून मी तो विषय बोललो. विचारपूर्वक बोललो. आणि हे खरंच आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाला सर्वांची गरज आहे. माझी गरज आहे, त्यांची गरज आहे. यांची गरज आहे. राजकारण एकाच पक्षाचं नसतं.

राजकारणात पक्ष पाहिजे, विरोधक पाहिजे. सर्व पक्षाचे लोकं पाहिजे. ठीक आहे. त्यांच्या शुभेच्छा समजूया”, असं फडणवीस म्हणाले.

 

Leave a comment