file photo

मुंबई: गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या महामंडळे व देवस्थानांच्या विश्वस्तपदाच्या निवडीला आता कुठं मुहूर्त मिळाला असताना महामंडळावर कुणाचे किती सदस्य असावेत, यावरून आघाडीत बिघाडी झाली आहे. विसंवादी सूर निघत आहेत.

समान वाटपावरून परस्परविरोधी भूमिका

महाविकास आघाडीमध्ये महामंडळ वाटपाचा मुद्दा चर्चेत असून या मुद्द्यावरून आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महामंडळांचे वाटप तिन्ही घटक पक्षांमध्ये समसमान व्हावे असे काँग्रेसची अपेक्षा असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हे वाटप आमदारांच्या संख्येनुसार होईल असे म्हटले आहे; मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

महामंडळांचे लवकरच वाटप

महामंडळांचे वाटप करण्याबाबत मुंबईतील सह्याद्री या अतिथीगृहात महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,

मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, तसेच शिवसेनेकडून मंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. येत्या काही दिवसांत महामंडळाचे वाटप करण्यात येईल, असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे.

निकषावरून मतभेद

महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये महामंडळांचे वाटप समान होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

तर दुसरीकडे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हे वाटप आमदारांच्या संख्येनुसार होईल, असे म्हटले आहे. तीन घटकपक्षांपैकी शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे संख्येनुसार वाटप झाल्यास सर्वाधिक महामंडळे शिवसेनेकडे येणार आहेत.

साई संस्थान राष्ट्रवादीला, पंढरपूर काँग्रेसकडे

आजच्या महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीबाबत मिळालेल्या माहतीनुसार, शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळू शकते,

तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून शिर्डी संस्थानचे अध्यक्ष म्हणून आशुतोष काळे यांचे नाव निश्चित होऊ शकते.

Advertisement

विश्वस्त म्हणून अजित कदम, पांडुरंग अभंग, संग्राम कोते, संदीप वर्पे, अनुराधा आदिक यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.