कायदा व सुव्यवस्था राखण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्या पोलिस उपनिरीक्षकानेच जमावाला भडकावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. त्याची शिक्षा संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला मिळाली असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास मज्जाव
प्रणिल मारुती चौगले असे निलंबित केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चौगले हे वाकड पोलिस ठाण्यात नेमणुकीस असताना ४ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांच्या भावाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता.

त्या वेळी वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता चौगुले हे भुदरगड पोलिस ठाण्यात गेले. तेथील पोलिसांशी हुज्जत घातली. त्या वेळी पोलिस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते.

Advertisement

भुदरगड पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी जमावाला शांत करीत होते. त्या वेळी चौगले यांनी जमावाला भडकावले. त्यामुळे तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी चौगले यांच्याकडील पिस्तूल जमा करून घेतले.

विभागीय चाैकशीत दोषी
भुदरगड पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी चौगले यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्याची सुनावणी सुरू असताना चौकशीतील सरकारी साक्षीदारांसोबत चौगले यांनी बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला,

असा ठपका ठेवत चौगले यांना निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

Advertisement