Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत

सरासरीइतका पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; परंतु राज्याच्या ब-याच भागांत गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही आणि आता आणखी दहा दिवस पाऊस होण्याची शक्यता नसल्यानं शेतक-यांत चिंता आहे.

पावसात मोठा खंड

जुलैमध्ये राज्याच्या काही भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. येत्या ९- १० जुलैपर्यंत देशभरात माॅन्सूनमधील खंड कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

‘आयएमडी’चे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्र यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत जुलैमधील पावसाचा अंदाज सादर केला.

‘जुलैचे पहिले दहा दिवस मोठ्या पावसाची शक्यता नसली, तरी देशभरात या महिन्यात पाऊस सर्वसाधारण (सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के) राहील,’ असे डॉ. महापात्र यांनी या वेळी सांगितले.

१२ जुलैनंतरच पाऊस

‘येत्या ११-१२ जुलैला उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्या आधी देशभरात सर्वदूर पावसाची शक्यता नाही.

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यावरच माॅन्सूनचा थांबलेला प्रवास पुन्हा सुरू होईल आणि तो दिल्ली ते राजस्थानपर्यंतचा प्रदेश व्यापेल,’ असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस

‘प्रदेशनिहाय अंदाजानुसार जुलैमध्ये कोकण, उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जुलैच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात चांगला पाऊस अपेक्षित आहे,’ असेही डॉ. महापात्र म्हणाले.

पाऊस सरासरी गाठणार का ?

‘हिंदी महासागरात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोलची (आयओडी) स्थिती राहण्याची शक्यता आहे.

निगेटिव्ह आयओडीची स्थिती पावसासाठी प्रतिकूल मानली जाते. अशा स्थितीत माॅन्सून यंदा सरासरी गाठणार का, याचे उत्तर जुलैअखेरीस देण्यात येणाऱ्या उर्वरित हंगामाच्या अंदाजात मिळू शकेल,’ असे डॉ महापात्र यांनी सांगितले.

 

Leave a comment