कोरोनाच्या लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न असला, तरी झोपडपट्टीतील नागरिकांपर्यंत हे प्रबोधनाचे वारे अजून पोचलेले नाही. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.

५१ टक्के नागरिकांत भीती

यामागच्या कारणाचा शोध घेतला असता, तब्बल ५१ टक्के नागरिकांना लसीकरणामुळे आरोग्याला धोका निर्माण होईल अशी भीती आहे.

लसीकरणाबाबत चुकीची व अर्धवट माहिती मिळाल्याने ३० टक्के नागरिक लसीकरणापासून लांब राहात असल्याची चिंताजनक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

Advertisement

त्यामुळे एकीकडे पुणे महापालिकेने झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे स्वागत होत असले, तरी या भागात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत.

लसीकरण करण्यासाठी पाच कारणे

पुणे आणि मुंबईमध्ये एकूण सात संस्थांनी सर्वेक्षण केले. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये आकांक्षा फाउंडेशन, टीच फॉर इंडिया आणि आय टीच स्कूल्स या संस्थांचा सहभाग होता. यामध्ये १८ ते पुढील वयोगटाचे १ हजार ३०० नागरिकांचा समावेश होता.

लसीकरण करण्यास का टाळाटाळ केली जात आहे याचे कारण विचारण्यात आले. त्यामध्ये प्रमुख पाच कारणे आढळून आली.

Advertisement

लसीकरणामुळे आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो, लसीकरणाबद्दल अपूर्ण माहिती, सशुल्क लसीकरण परवडत नाही, लस उपलब्ध नसल्याने लस घेतली नाही आणि माझी तब्येत उत्तम आहे, लसीची गरज नाही हे कारण सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

या भागात झाले सर्वेक्षण

पेठ भाग, कोथरूड, मुंढवा, येरवडा, हडपसर, आकुर्डी, औंध, कोंढवा, सोमवार पेठ, भवानी पेठ, गंज पेठ, कोरेगाव पार्क, बोपोडी, कासारवाडी, केळेवाडी, पिंपरी, मोशी आणि बोपखेल या भागात सर्वेक्षण करण्यात आले आहे.

 

Advertisement