मतदार कायम उदासीन असतात. आपले नाव मतदार यादीत आहे, की नाही, छायाचित्र आहेत, की नाही, याबाबत नागरिक कधीच पडताळणी करीत नाही. त्यामुलं पुणे जिल्ह्यात तब्बल पावणेचार लाख मतदार छायाचित्र नसलेले आहेत.

त्यांना मतदान करता येणार नाही. मतदारांची संख्या थोडीथोडकी नाही, तर तब्बल एका विधानसभा मतदारसंघातील मतदारांपेक्षाही जास्त आहे.

दुबार, स्थलांतरित, मृतांचा समावेश

शहरी मतदार उदासीन आहे…मतदानासाठी ते घराबाहेरच पडत नाहीत…अशी कारणे सांगितली जातात; परंतु मतदार याद्यांमध्ये स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

Advertisement

पुणे जिल्ह्यात तब्बल पावणेचार लाख मतदारांचे छायाचित्र नसून, त्यात बहुतांश स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीत शहरी मतदानाचा टक्का कमी दिसत असल्याचे समोर आले आहे.

दुबारांना स्वतः अर्ज भरून द्यावा लागणार

जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ७८ लाख ८७ हजार ८७४ इतकी आहे. त्यापैकी तीन लाख ७९ हजार ९३३ मतदारांचे छायाचित्र नाही. त्यामध्ये पुणे शहरातील आठ मतदारसंघातील मतदारांची संख्या सर्वाधिक तीन लाख १५ हजार ३५९ असून, ग्रामीणच्या तुलनेत जास्त आहे.

जुन्या मतदारयादीतील मृत मतदारांच्या कुटुंबीयांनी मृत्यूचा दाखला देऊन यादीतून नाव कमी केलेले नाही. काही मतदारांनी दोन-दोन ठिकाणी नावे नोंदवली आहेत. दुबार नावे असलेल्या मतदारांनी स्वतःहून सात क्रमांकाचा अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

Advertisement

छायाचित्र नसलेल्यांची वेगळी यादी

निवडणूक विभागाकडून २००८ पासून छायाचित्रासह मतदार नोंदणी केली जाते. त्यामुळे नवीन मतदारांची नावे छायाचित्रांसह आहेत. जुन्या यादीतील रंगीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची वेगळी यादी तयार करण्यात आली आहे.

ही यादी मतदान केंद्रनिहाय ठेवण्यात येईल. केंद्रावरील अधिकाऱ्यांना पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा रहिवासी पुरावा दाखवणे आवश्यक आहे. अशा मतदारांची खात्री पटल्यानंतरच मतदान करता येणार आहे.

Advertisement