पुणेः वाढदिवस किंवा अन्य समारंभ कोरोनामुळे बाहेर जाऊन साजरे करता येत नाहीत. असे समारंभ रात्री होत असतात; परंतु सायंकाळनंतर हाॅटेल्स बंद होतात.
त्यामुळे आॅनलाईन अन्नपदार्थ मागविण्याची क्रेझ वाढली आहे. त्यात दक्षता घेतली नाही, तर गंडा बसू शकतो. अलीकडे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
आईवडीलांचा वाढदिवस पडला महाग
आई-वडिलांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवसासाठी जेवणाचे डबे ऑनलाइन मागवणे एका महिलेला महागात पडले आहे. डब्यांसाठी ऑनलाइन ऑर्डर देताना एका अनोळखी मोबाइलधारकाने महिलेची ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी एका ४६ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून एका मोबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या आई-वडिलांचा लग्नाचा ५० वा वाढदिवस होता. त्यासाठी तक्रारदार महिलेला टिळक रस्त्यावरील एका नामांकित रेस्टॉरंटमधून जेवण मागवायचे होते. संबंधित रेस्टॉरंटचे डबे मिळतील, अशी जाहिरात तक्रारदार महिलेने फेसबुकवर वाचली होती.
त्या जाहिरातीतील मोबाइल नंबरवर महिलेने फोन करून डब्यांची चौकशी केली. समोरील व्यक्तीने ऑर्डरसाठी तक्रारदाराच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली आणि अॅडव्हान्स म्हणून दहा रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिलेने दहा रुपये पाठवले. त्यानंतर मोबाइलधारक व्यक्तीने तक्रारदार महिलेकडून त्यांच्या क्रेडिट कार्डाची माहिती घेतली.
त्या माहितीच्या आधारे तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डावरून ४९ हजार ७६० रुपयांचे ट्रान्झॅक्शन केले. त्याचा मेसेज तक्रारदाराच्या मोबाइलवर प्राप्त झाल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.
‘खात्याची गोपनीय माहिती देऊ नका’
ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते किंवा डेबिट-क्रेडिट कार्डाची गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून वारंवार केले जाते.
सोशल मीडियावर एखादी जाहिरात पाहून व्यवहार करताना, त्या जाहिरातीची पडताळणी करून पाहणे गरजेचे आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.