Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अखेर ‘त्यां’ची समजूत काढून ३७ कुटुंबातील नागरिकांना सुरक्षित स्थळी!

राज्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असताना वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातील घरांना तडे गेले होते. त्यामुळे चिंता व्यक्त होत होती; परंतु ग्रामस्थ घर सोडायला तयार नव्हते.

अखेर पोलिस आणि महसूल विभागाने त्यांची समजूत काढून ३७ कुटुंबातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.

भोजन व अन्य सुविधा उपलब्ध

मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात दरड कोसळून २०० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ३७ कुटुंबातील १५३ जणांचे स्थलांतर पुणे ग्रामीण पोलिस आणि महसूल विभागाने केले.

रहिवाशांची शाळा, मंदिरे तसेच नातेवाइकांकडे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना भोजन आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कडा कोसळून मोठा आवाज

वेल्हे तालुक्यातील कर्नवडी गाव महाड तालुक्याच्या हद्दीवर आहे. सह्याद्रीचा कडा उतरून कर्नवडीत जाता येते. वेल्हे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवसांपूर्वी घरांना तडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

वेल्हे तालुक्यातून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात जाण्यासाठी दुर्गम भागातून जाणा-या शिवकालीन वाटा आहेत.

कडे-कपारीतून पायपीट करून महाड तालुक्यात उतरता येते. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कडा कोसळून मोठा आवाज झाला होता.

संभाव्य धोक्याची जाणीव

वेल्हे पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, तहसीलदार शिवाजी शिंदे, केळद गावचे सरपंच रमेश शिंदे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना स्थलांतराची विनंती केली; मात्र ग्रामस्थ स्थलांतरित होत नव्हते.

पवार, शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती सभापती दिनकर धरपाळे, नाना राऊत यांनी पुन्हा कर्नवडी, केळद, निगडे खुर्द भागातील ग्रामस्थांची भेट घेऊन संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली.

त्यानंतर ३७ कुटुंबांतील १५३ जणांचे स्थलांतर करण्यात आले. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने कर्णवडी ते रानवडी रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

 

Leave a comment