खरिपाच्या हंगामात रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असताना, केंद्र सरकारने बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खतांवरील अनुदान आणखी ७०० रुपयांनी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खताची २४०० रुपयांची एक गोणी १२०० रुपयांना, म्हणजेच जुन्याच दरात मिळणार आहे.

यामुळे सरकारी तिजोरीवर १४,७७५ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली गत महिन्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना जुन्याच दराने खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी डीएपी खतांच्या अनुदानात १४० टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा मोदींनी केली होती.

Advertisement

त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनुदानाची रक्कम वाढवण्याला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. देशातील शेतकऱ्यांकडून युरियानंतर खतांमध्ये डीएपीचा सर्वाधिक वापर केला जातो.