एकीकडे काँग्रेसने दबावाचे राजकारण सुरू केले असताना दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

वाढलेल्या भेटीगाठी काय सांगतात ?

मोदी आणि पवार यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या वेळी पवार आणि मोदी यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली.

या भेटीत बँकिंग क्षेत्राचे प्रश्न, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याबाबत चर्चा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील अन्य घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या भेटीगाठीच्या सिलसिल्यानंतर आज पवार आणि मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

फडणवीस-भुजबळ भेट

15 जुलै रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मुंबईत भेट झाली. छगन भुजबळ हे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर दाखल झाले.

या वेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलं. या भेटीत भुजबळ हे एखादा निरोप घेऊन फडणवीस यांना भेटले, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Advertisement

फडणवीस दिल्लीला रवाना

भुजबळ यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस राजधानी दिल्लीला रवाना झाले. या दौऱ्यात त्यांनी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आदींची भेट घेतली.

इतकंच नाही तर नव्याने निर्माण झालेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भुजबळांनी दिलेला निरोप फडणवीसांनी सांगितला, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

मोदी- शरद पवार भेट

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवार आणि मोदी यांच्या बैठकीत फक्त हवापाण्याच्या चर्चा तर झाल्या नसतील, असं वक्तव्य केलं आहे.

Advertisement

त्यामुळे आगामी काळात राज्यात सत्ताबदल्याच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे शिवसेनेला चेकमेट तर होणार नाही ना? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

 

Advertisement