पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या घटना मुंबईत सातत्यानं होत असतात. उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी इमारत कोसळल्याची दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीच्या ढिगा-याखाली पाच जण अडकले असल्याची भीती आहे.

३४ लोकांना काढले बाहेर

आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची इमारत असल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.

आतापर्यंत 34 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट हा उच्चभ्रू परिसर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

डागडुजीच्या ठिकाणी पडझड

बचाव पथकाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून, नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत दुरुस्तीचं काम सुरू होतं.

ही इमारत काही वर्षे जुनी आहे. त्यामुळे आतल्या बाजूने डागडुजी सुरू होती. ही म्हाडाची इमारत असून, जिथं डागडुजी सुरू होती, तिथेच पडझड झाल्याची माहिती मिळत आहे.

बाहेर काढलेले सर्व सुखरूप

या इमारतीचा तिसरा आणि चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. पडझड सुरू होताच 34 रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. ते सर्व नागरिक सुखरुप आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

सध्या मुंबईत पावसाचा जोर नसला तरी जुन्या इमारतींना धोका कायम आहे. नुकतीच येऊन गेलेली वादळं, जोरदार पाऊस यामुळे जुन्या इमारतींचे काही भाग कोसळल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत.

मुंबई महापालिकेकडून जुन्या आणि धोकादायक इमारतींना नोटीस पाठवून, त्या रिकाम्या करण्याचे आदेश दिले जातात. आता ज्या इमारतीचा भाग कोसळला आहे, त्या इमारतीला अशा काही सूचना दिल्या होत्या का हे पाहणं महत्त्वाचं आहे.