पुण्याच्या हडपसर भागातील बिल्लाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल (बीएचआयएस) मधील पाच वर्षीय माहिका पोतनीस हिने पाच मिनिटांच्या अल्पावधीत श्लोक पठणाचा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे.

श्लोक पठणात रुची

नव्याने शाळेची वाट धरलेली लहान मुले अभ्यासाच्या पायाभूत संकल्पना, अंक आणि अक्षरे समजून घेण्यात गुंततात; परंतु वयाच्या चार वर्षांपासून माहिकाने नियमितपणे पवित्र धर्मग्रंथातील अध्यायांच्या पाठांतराला सुरवात केली.

तिची आई सारिका यांना माहिकाला श्लोक पठणात रुची असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी माहिकला पाठांतर वर्गात दाखल केले. अशा रीतीने या माय-लेकीने स्पर्धेत सहभागी होण्याचे निश्चित केले.

Advertisement

कालांतराने माहिकाचा श्र्लोक पाठांतराचा एक व्हिडिओ रेकॉर्ड बुकला पाठविण्यात आला आणि तो निवडला गेला. अवघ्या पाच मिनिटांत माहिकाने ३० श्लोकांचे पाठांतर केले आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाली. तिच्या या कामगिरीसाठी बीएचआयएस शाळेच्या प्राचार्या श्रुतिका लवंद यांनीदेखील तिचे कौतुक केले.

शिस्तशीर मुलगी

आमच्याकडे नेमाने पूजा करण्याची पद्धत आहे. त्यात माहिका सोबतीला असायची. आमचे रोजचे श्लोक पठण तिच्या कानावर जात असत. तिने ते पटकन पाठ केले आणि इतक्या लहान वयात श्लोक शिकली.

ती एक शिस्तशीर मुलगी आहे. आपल्या संस्कृती आणि परंपरेवर तिचे प्रेम आहे. इतक्या लहान वयात तिला हा छंद जडला असून आम्हाला त्याचा खूप आनंद आहे.

Advertisement