पिंपरी चिंचवड :- शहरात प्लाझ्मादान करणाऱ्या कोरोना मुक्त नागरिकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. मात्र, राष्ट्रवादीने फ्लेक्सबाजी करुन नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी प्रत्यक्ष खातरजमा करुनच खोटी प्रसिध्दी मिळवायचे थांबवावे, असा आरोप महापालिका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

नामदेव ढाके म्हणाले, कोरोनामुक्त रुग्ण प्लाझ्मादानासाठी आवाहन करुनही स्वयंस्फुर्तीने पुढे येत नव्हते. त्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये प्लाझ्मादान करणाऱ्या व्यक्तीस पालिकेकडून दोन हजार प्रोत्साहनपर देण्यात येतात. त्यानुसार सुमारे ३४१ लोकांनी प्लाझ्मादान केले.

वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मादान केलेल्या एकूण ३४१ व्यक्तींपैकी जवळपास १५० व्यक्तींच्या थेट खात्यावर ६ जून रोजी रक्कम जमा करण्यात आली. उर्वरित व्यक्तींच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा करण्याची कार्यवाही पूर्ण होईल. यामध्ये एकाही व्यक्तीला वंचित ठेवले जाणार नाही.

Advertisement

आम्हाला आपत्तीच्या काळात गोरगरिबांना मदत मिळवून द्यायचीच आहे. गरिबांना तीन हजार रुपये मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, श्रेयवादासाठी व पालिका निवडणुकीवर डोळा ठेवून आयुक्तांवर दबाव टाकला गेला. त्यामुळे शहाणपण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही ढाके म्हणाले.