अतिशय दुर्मीळ आणि प्रचंड महागडी असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी टोळी कार्यरत आहे. अशाच एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

दहा कोटींची अंबरग्रीस जप्त

व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करणाऱ्या दोन टोळ्यांवर गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवाई केली आहे. सात कोटींच्या अंबरग्रीससह लोअर परळ येथून दोघांना तर अडीच कोटींच्या अंबरग्रीससह मुलुंड येथून तिघांना अटक करण्यात आली.

अंबरग्रीस फार दुर्मीळ आणि शुभ मानले जात असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली केली जाते. तरंगते सोने या नावानेही ते ओळखले जाते.

Advertisement

अलिबागहून आलेल्या दोघांना अटक

संरक्षित असलेल्या व्हेल माशाच्या अंबरग्रीसच्या खरेदी आणि विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. अंबरग्रीसची मुंबईत प्रचंड मागणी असून काही जण अलिबागहून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लोअर परळच्या सीताराम मिल कंपाउंड परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

इनोव्हा कारमधून आलेल्या या दोघांकडे सुमारे साडेसात किलो अंबरग्रीस सापडले. या दोघांविरुद्ध एन. एम. जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

Advertisement

आरोपीत बडतर्फ पोलिस

विशेष म्हणजे यातील एक आरोपी बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे ४चे प्रभारी पोलिस निरीक्षक इंद्रजीत मोरे यांच्या पथकाने मुलुंड परिसरात सापळा लावून तिघांना अटक केली. त्यांच्याकडे अडीच किलो पेक्षा जास्त वजनाचे अंबरग्रीस सापडले. पोलिसांनी वन विभागालादेखील या कारवाईची माहिती दिली आहे.

उलटी म्हणजे काय ?

व्हेल माशाच्या उलटीचा सुगंधी द्रव्य, मद्य तसेच, औषधे करण्यासाठी वापर केला जातो. माशाच्या पोटात हा पदार्थ तयार होतो. याला समुद्रातील तरंगते सोने असेही म्हटले जाते. घरात ठेवणे शुभ मानले जात असल्याने ते कोट्यवधी रुपयांना विकले जाते.

Advertisement