भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करीत असतात. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या उद्घाटनाला जमलेल्या गर्दीवरून पवार यांच्यावर भाजप टीका करीत असताना चंद्रकांतदादांनी मात्र अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे.

बचावात्मक भूमिका

चंद्रकांतदादांच्या वाढदिवसाला तसेच भाजपच्या वर्धापनदिनी पुण्यात कोरोनाचे नियम पाळून भाजपच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केले होते. आताही भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमालाही गर्दी होण्याच्या शक्यतेने चंद्रकांतदादांनी पवार यांच्याबाबत बचावात्मक भूमिका घेतली.

कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर नेत्यांचा काही दोष नाही. प्रत्येक वेळी टीका करायला पाहिजे असे नाही. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Advertisement

संयोजकावर ठपका

संयोजकांनी कार्यक्रम ऑनलाईन दाखवले तर गर्दी होणार नाही. पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या अनुयायांनी अडचणीत आणू नये. गर्दीचे खापर त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांवर फोडले.

काय झाले होते ?

नागरिकांनो गर्दी करू नका, अशी सतत तंबी देणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गर्दी झालेल्या सभेला संबोधित करण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुरक्षित वावराचा फज्जा उडाला.

‘कार्यकर्त्यांनी आणि पदाधिर्‍यांनी उत्साहापोटी नियमावलीचे पालन केले नाही, ही खंत माझ्या मनात आहे,’ अशी मखलाशी पवार यांनी केली होती.

Advertisement