मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबईमध्ये (Mumbai) देशातील पहिली वॉटर टॅक्सी (Water taxi) प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र आता तीच बहुचर्चित वॉटर टॅक्सी बंद होणार आहे.

मुंबई ते बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा (Elephanta) मार्गावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा चालू करण्यात येणार होती.

परंतु त्याआधीच या प्रकल्पाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे २९० रुपयांत जलसफरीचे स्वप्न अधुरे राहणार आहे.

Advertisement

या सेवेची घोषणा झाल्यानंतर ५६ आसनी बोटीसाठी २९० रुपये आणि लहान बोटींसाठी ८०० ते १,२१० रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले होते.

या बोटीचे तिकीट परवडणारे असल्याने नव्या मार्गावर किमान एकदातरी जलसफर अनुभवण्याचे नियोजन सर्वसामान्यांनी केले होते. मात्र ही बोट या मार्गावर चालवणे परवडणारे नसून एका फेरीमागे १२ हजार रुपयांचे डिझेल (Diesel) खर्च होत आहे.

तसेच यामध्ये प्रवासी संख्या ५ ते ७ इतकीच नोंदविण्यात येत असल्यामुळे फेरीमागे दीड-दोन हजार रुपयेच मिळत आहेत.

Advertisement

तिकिटाच्या २९० रुपयांमधील ३० रुपये शासनाला कर स्वरुपात द्यावे लागतात. त्यामुळे फेरीबोट चालकांच्या हातात केवळ २६० रुपये उरतात, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.