file photo

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना आणि तिथली सत्ता मिळवू,असा आत्मविश्वास एकीकडे व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या विरोक्षी पक्षनेतेपदासाठी भाजप हट्टाला पेटला आहे.

वारंवार फटके बसूनही भाजप वेताळी हट्ट सोडायला तयार नाही. आता सर्वोच्च न्यायालयानेच फटकारल्याने भाजपची कोंडी झाली आहे.

सर्वोच्च धक्का

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून सर्वोच्च न्यायालयाने भाजपला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपने दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने पुन्हा फेटाळून लावली आहे.

Advertisement

त्यामुळे पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच कायम राहाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

का केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा?

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले; मात्र राज्यात शिवसेनेसोबत सरकारमध्ये असल्याने भाजपने विरोधी पक्षात न बसण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ३० नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. महापालिकेच्या कायद्यानुसार हे पद देण्यात आले होते;

मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर भाजपने पालिकेत आपण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे स्पष्ट करत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता.

Advertisement

महापाैरांनीही नाकारले

विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असल्याने अचानक दावा केलेल्या भाजपला ते देता येत नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले होते. त्याविरोधात भाजपने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तिथे भाजपच्या विरोधात निकाल लागल्याने भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याने भाजपच्या पदरी निराशा आली होती. त्यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

असंतोष निर्माण करण्याचा बेत फसला

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच विरोधी पक्षनेतेपद घेऊन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेविरोधात लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न होता;

Advertisement

मात्र सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा धक्का दिल्ल्याने भाजपचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपकडून नेमकी कोणती नवी रणनीती आखली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.