शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. मात्र काही दिवसांपासून त्यांचा आजार बळावला आणि प्रकृती ढासळली. त्यातच आज दुपारच्या सुमारास बाबुराव पाचर्णे यांची शिरूर येथे प्राणज्योत मालवली आहे.

त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.बाबुराव पाचर्णे यांच्यावर मागील काही दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कँन्सर सारख्या गंभीर आजाराने पाचर्णे यांना ग्रासले होते. अखेर आज सकाळी उपचारादरम्यान, पाचर्णे यांनी प्राणज्योत मालवली.

दोनच दिवसांपूर्वी पाचर्णे यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत डॉक्टरांकडून तब्येती माहिती घेतली होती.

या वेळी पाचर्णे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबूराव पाचर्णे लवकरात लवकर बरे होतील आणि जनतेच्या विकासासाठी पुन्हा ते आपल्या सरकार कडे विकासकामांसाठी आग्रही राहतील अशी भावना व्यक्त केली होती.

शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. २०१४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अशोक पवार यांना हरवून विजय मिळवला होता. त्यांच्या जाण्याने मतदारसंघात भाजपचा मोठा धक्का बसला आहे.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यानच त्यांच्या प्रकृतीविषयी कुरबूरी सुरू झाल्या होत्या. त्या निवडणूकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले.

पुण्यातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले. परंतू दीड वर्षांच्या या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि आज अखेर येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.