माजी महापाैर प्रशांत जगताप यांची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार करण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

विशेष सभेचा निर्णय संशयास्पद

महानगरपालिका निवडणुकीआधी पुणे शहरातील राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयानंतर अवघ्या बारा दिवसात विशेष सभा बोलविण्याचा निर्णय संशयास्पद आहे.

नव्या गावांच्या विकास आराखड्याबाबत इरादा जाहीर करण्यासाठी बोलावलेली विशेष सभा बेकायदेशीर असून त्याविषयी आम्ही राज्य सरकारकडे दाद मागणार आहे,’ असे जगताप यांनी म्हटले आहे.

‘निवडणूक निधी जमा करण्याचा भाजपचा डाव’

‘विकास आराखड्याच्या माध्यमातून निवडणूक निधी गोळा करण्याचा भाजपचा डाव आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

त्यासाठी खास सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून येत्या गुरुवारी १५ जुलैला ही खास सभा होणार आहे. ही सभा बेकायदेशीर आहे,’ असा दावा जगताप यांनी केला.

महापौरांचे प्रत्युत्तर

महापौर मुरलीधर मोहोळ हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात हा सामना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.