पुणे राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना धमकी देत ३० कोटींची खंडणी मागण्याऱ्या डॉक्टरला नुकताच २ महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला.
त्याचे कारणही तसेच आहे. या डॉक्टरने ससून रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय ५२, रा. शिरुर) असे या डॉक्टराचे नाव आहे. डॉ. भिसे यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर ६० दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉ. भिसे यांनी स्वत: कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्याला जामीन द्यावा, असा अर्ज न्यायालयाकडे केला होता.
अतिरक्त सत्र न्यायाधीश शिरसीकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉ.भिसे यांचे म्हणणे ऐकून घेतले. ते खासगी हॉस्पिटलमध्ये गेली २० वर्षे स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. त्यांचे पुण्यातील सदाशिव पेठेत घर आहे.
ते पळून जाण्याची शक्यता नाही़ असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. उच्च स्तरीय समितीच्या नियमावलीनुसार, डॉ. भिसे यांना जामीन मिळू शकत नाही़ पण कोरोना बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी त्याचा विचार होऊ शकतो,असे निरीक्षण न्यायालयाने नमूद केली.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व वैद्यकीय विभागावर त्याचा मोठा ताण आला आहे. त्यामुळेशासनाने खासगी डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात सेवा देण्याचे आवाहन केलेआहे.
तसेच ससून रुग्णालयात सध्या १३६ खासगी डॉक्टर आपली सेवा देत असल्याचे न्यायालयाने सांगितले. आरोपीला वैद्यकीय सेवेचा अनुभव असूनत्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाला उपयोग होईल.
हे सर्व पाहता डॉ. भिसेयांची ससून रुग्णालयात सेवा करण्याची इच्छा लक्षात घेऊन समाजाच्याहितासाठी त्यांना तात्पुरता जामीन देणे योग्य होईल, असे नमूद करीत त्याचा ६० दिवसांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला.
न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यात डॉक्टरांनी आठवड्यातील ५ दिवस डॉक्टर म्हणून ससून रुग्णालयात कोविड -१९ च्या रुग्णांवर उपचार करावेत. त्यांनी साक्षीदारांवर दबाव टाकू नये.
या जामीनाची मुदत संपण्याअगोदर कारागृहात हजर रहावे. त्यावेळी त्याने ससून हॉस्पिटलच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र सादर करावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.