ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

लष्करात अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक

वेगवेगळ्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. पुण्यात लष्करात अधिकारी असल्याचे बनावट आयकार्ड दाखवून तरुणीला व तिच्या आईला फसवून लग्न केले. पत्नीच्या भावाला लष्करात भरती करतो, असे सांगून दोन लाख रुपयांना लुबाडले. तसेच त्यांच्या गावाकडील तरुणांना बनावट भरतीचे पत्र देऊन ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जानेवारीतील प्रकार

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी योगेश दत्तु गायकवाड (रा. किशोरे, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आळंदी येथील एका २१ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बिबवेवाडीत जानेवारी २०२० मध्ये घडला होता.

विश्वास संपादन करून फसवणूक

महिलेच्या आईला रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याने त्यांना बिबवेवाडी येथील हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या. प्राथमिक उपचार करुन त्या हॉस्पिटलसमोर रिक्षाची वाट पाहत होत्या. त्या वेळी योगेश गायकवाड तेथून जात असताना त्याच्या पँटच्या खिशातून आधार कार्ड पडले.

ते महिलेने पाहिल्यावर ते देण्यासाठी त्यांनी आवाज दिला. गायकवाड याने त्यांच्याशी जवळीक साधून लष्करात अधिकारी असल्याचे सांगितले. लष्कराच्या गणवेशातील फोटो, बनावट आयकार्ड दाखवून महिला आणि यांच्या आईवडीलांचा विश्वास संपादन केला.

खोटे बोलून लग्न

२१ वर्षीय महिलेशी खोटे बोलून लग्न केले. त्यानंतर त्याने महिलेला लष्करात मोठी भरती निघाल्याचे सांगितले. मुले भरण्यासाठी महिलेच्या वडिलांकडून त्यांच्या भावास भरती करण्यासाठी दोन लाख रुपये घेतले.

तसेच त्यांच्या गावातील व बाहेरील गावातील मुलांचा विश्वास संपादन करुन त्यांना लष्करामध्ये भरती करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ५० ते ६० लाख रुपये घेतले. त्यांना लष्करात भरती झाल्याबाबत बनावट भरती पत्र देऊन त्यांची फसवणूक केली़.

नगरमध्येही तक्रार

आरोपीविरुद्ध अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. उसगांवकर यांनी सांगितले की, आरोपीने फसवणूक केल्याचे फिर्यादीसह १० जणांच्या तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत.

 

You might also like
2 li