भिशीत गुंततवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला असताना आता दुस-या तशाच प्रकरणात एका महिलेला २४ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

फसवणूक करणा-या कुटुंबाविरोधात गुन्हा

भिशीत पैशांची गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाने व्यावसायिक महिलेची सुमारे २३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाली.

या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्योती अगरवाल (वय ४७, रा. उंड्री) यांनी तक्रार दिली आहे.

Advertisement

त्यानुसार मेलूकुलम श्रीनिवासन, सीमा श्रीनिवासन आणि वरुण श्रीनिवासन (रा. सर्व केरळ) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०१५ ते जून २०२१दरम्यान बोपोडी परिसरात ही घटना घडली.

अर्धी रक्कम परत केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्योती हॉटेल व्यावसायिक असून, आरोपी श्रीनिवासन यांची नोंदणीकृत कंपनी आहे. एका व्यक्तीमार्फत त्यांची ओळख झाली होती.

संपर्क वाढल्यावर भिशीतून जादा परतावा मिळत असल्याचे सांगून आरोपींनी ज्योती यांना त्यात पैसे भरण्यास सांगितले. जास्त पैशांच्या आमिषाने श्रीनिवासन यांच्या भिशीत ४७ लाख ५० हजारांची गुंतवणूक ज्योती यांनी केली होती.

Advertisement

त्यातील अर्धी रक्कम श्रीनिवासन यांनी ज्योती अगरवाल यांना परत केली; मात्र टाळेबंदीमुळे उर्वरित रक्कम देण्यास श्रीनिवासन कुटुंबीयांना जमले नाही.

त्यानंतर हे कुटुंब पैसे न देताच अचानक कोठे तरी पळून गेले. त्यामुळे आरोपींनी ज्योती यांची फसवणूक केल्याच्या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement