ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

बंगला भाड्याच्या देण्याच्या नावाखाली फसवणूक

फसवणूक करण्यासाठी अनेक जण नवनवे फंडे शोधत असतात. त्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जात असतो.

दुस-याच्या बंगल्याचे फोटो समाज माध्यमांत टाकून ते भाड्यानं देण्याचं दाखवून पर्यटकांची फसवणूक करण्याचा प्रकार लोणावळ्यात घडला.

दोघे भाऊ गजाआड

लोणावळा हे हिलस्टेशन म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. पावसाळा आला, की पर्यटक इथं गर्दी करतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन एक टोळीनं लोणावळ्यातील बंगल्याचे फोटो शेअर करत काही नागरिकांना लुबाडले आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित टोळीतील दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश रूपकुमार जाधवानी (वय 26) आणि आकाश रूपकुमार जाधवानी (वय 22) अशी आरोपींची नावे आहेत

नेमकं प्रकरण काय ?

अशी केली फसवणूक

मुंबईतील एका कुटुंबाने 24 जून ते 27 जून दरम्यान लोणावळ्यात सुट्टी घालवण्याचे नियोजित केले होते. त्यांनी इन्स्टाग्रामवर लोणावळा व्हिला 77 या अकाउंटवर बंगला भाड्याने मिळेल, अशी जाहिरात बघितली होती.

त्याच जाहिरातीच्या आधारावर त्यांनी दिलेल्या नंबरवर आरोपींशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपींनी 9529971404 या नंबरवर व्हाट्सअॅप चॅटिंगद्वारे उत्तर दिलं. समोरील व्यक्तीने फिर्यादीस बंगल्याचे फोटो पाठवले.

फिर्यादीने भाडे विचारले असता त्याने एका रात्रीसाठी नाश्ता आणि जेवणासह 28 हजार रुपये भाडे लागेल, असे सांगितले. तसेच बंगला क्रमांक 33-34, कुणे व्हिलेज, खंडाळा, लोणावळा असा बंगल्याचा पत्ता सांगितला.

त्यानंतर समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन तक्रारदार यांनी आरबीएल बँकेचे खाते क्रमांक 309013336219 वर आयएमपीएसने 30 हजार रुपये आणि एसबीआय बँकेचे खाते क्रमांक 20316173741 या खात्यावर 20 हजार रुपये इतकी रक्कम पाठवली.

आरोपींनी त्यांना lonavalavillas77@gmail.com या ईमेल आयडीवरून रिसीट पाठवली. पुढील पाठपुरावा करण्याकरता नमूद व्हाट्सअॅप धारकाने 9156168118 आणि 8390864676 हे मोबाईल नंबर दिले.

पैसे परत द्यायला नकार

आरोपींनी 24 जूनला तक्रारदारांना व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवला. यामध्ये त्यांनी बुकिंग केलेल्या बंगल्यामध्ये विजेचा स्फोट झाल्याचं सांगितलं. तसेच या स्फोटात बंगल्यातील एसी, टीव्ही, फ्रीज हे डॅमेज झाले असल्याने येऊ नका, असं सांगितलं.

त्यामुळे तक्रारदारांनी त्यांचे पैसे परत मागण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता आरोपींनी फोन उचलणे बंद केले. त्यानंतर तक्रारदारांनी व्हाट्सअॅपवर संपर्क साधला असता त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही.

यानंतर तक्रारदारांनी लोणावळा येथील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला बंगल्याच्या पत्त्यावर जाऊन चौकशी करण्यास सांगितले. या वेळी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण इंस्टाग्रामवरील जाहिरातीमधील पत्ता चुकीचा असल्याचं उघड झालं.

आरोपींनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर लोणावळा व्हिला 77 या नावाने कोणताही बंगला नव्हता असे आढळले. आपली फसवणूक झाली असं उघड झाल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसात तक्रार केली.

तांत्रिक आधारावर बेड्या

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचे मोबाईल नंबरचे लोकेशन प्राप्त केले. आरोपींचे लोकेशन हे पुण्यातील कल्याणी नगर, वडगाव शेरी परिसरात असल्याची माहिती मिळाली.

संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची टीम पुणे शहर येथे गेली आणि आरोपींचे मोबाईल क्रमांक, इंस्टाग्राम आयडी आणि बँक खात्याची माहिती प्राप्त केली.

त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे अविनाश रूपकुमार जाधवानी आणि आकाश रूपकुमार जाधवानी या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून मलबार हिल पोलिस ठाण्यात आणलं.

 

You might also like
2 li