राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांतला अंतर्गत कलह वाढला असताना आणि भाजपचे नेते आघाडीतील वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत असताना सरकार स्थिर नसल्याचे चित्र असले, तरी या सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.

सहा नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी
बारामतीत आज पत्रकारांशी ते संवाद साधत होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे मजबूतपणे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारची स्थापना झाली त्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यावतीने बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अजित पवार व जयंत पाटील यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Advertisement

कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होईल, त्यावेळेस हे सहा नेते एकत्र बसून चर्चा करून त्यातून मार्ग काढतात, त्यामुळे हे सरकार मजबूत आणि स्थिर आहे, सरकारला कसलाही धोका नाही असा स्पष्ट निर्वाळा पवार यांनी दिला.

पक्ष मजबुतीची प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी
एकीकडे सरकार चालवीत असले तरी तिन्ही राजकीय पक्षांची भूमिका ही वेगळी आहे. सरकारची भूमिका वेगळी व पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक पक्षाची भूमिका ही वेगळी आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक राजकीय पक्षाने आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वाभाविक आहे त्याच्यात काहीही गैरसमज नाही, असेही ते म्हणाले.

Advertisement

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष वाढीच्या संदर्भात जे जे काही प्रयत्न सुरू आहेत, त्याबद्दल या तीनही पक्षात सामंजस्याची भूमिका आहे कोणतेही मतभेद नाहीत, असेही स्पष्ट करण्यास पवार विसरले नाहीत.