file photo

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्वबळाचा नारा लावून तशी भाषा करणा-या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत गेल्यानंतर त्यांचा स्वबळाचा नारा फुसका असल्याचा प्रत्यय आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पटोले यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं केलेलं वक्तव्य यामुळं ते एकाकी पडले आहेत.

दिल्लीत बोलवून बैठक

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आहे; मात्र असे असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणे स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे; मात्र आता नाना पटोले यांचा स्वबळाचा हा नारा फुसका बार निघाल्याचं दिसत आहे.

पटोले यांना दिल्लीत बोलावले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि नाना पटोले यांच्यात दिल्लीत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत स्वबळाचा नारा, आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका,

विधानसभा अध्यक्षांची निवड या बाबींवर चर्चा झाली. ही बैठक पार पडल्यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

स्वबळाची भाषा अपरिपक्वतेची

ही बैठक जवळपास पावणे दोन तास सुरू होती. बैठकीनंतर एच के पाटील यांनी म्हटलं, स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा प्री मॅच्युअर आहे.

आत्ता तो विषय नाही. त्यामुळे महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देणारे पटोले हे दिल्लीत गारद पडले आणि त्यांचा स्वबळाचा नारा हा फुसका बार ठरला असल्याचं बोललं जात आहे.