file photo

पुणेः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आदेश पाळले जात नाहीत. बांधकाम विभागाच्या अधिका-यांची अनेकदा त्यांनी खरडपट्टी काढली; परंतु पुण्यात त्यांनी दिलेला शब्द आता थाप ठरला आहे.

चार महिन्यांनंतरही कामाला सुरुवात नाही

साडेचार महिन्यांपूर्वी म्हणजेच १३ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कात्रज उड्डाणपूलाच्या कामाला दोन महिन्यांत प्रारंभ होणार असा दिलेला शब्द हा कात्रजकरांसाठी थाप ठरत आहे.

गडकरी यांनी १३ फेब्रुवारीला पुणे शहरातील महामार्गांच्या कामाच्या आढावा दौऱ्यात कात्रजच्या उड्डाणपुलाच्या कामाला दोन महिन्यात प्रारंभ होईल अशी माहिती दिली होती; परंतु प्रत्यक्षात साडेचार महिने झाले तरी कामाला कुठल्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही.

Advertisement

१६९ कोटींचा निधी मंजूर

नवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात न येता ती थेट वंडरसिटी येथून उड्डाणपूलावरून राजस सोसायटीच्या पुढे जाणार आहे. परिणामी कात्रज चौकातील व राजस चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढल्या असून हा पूल राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून जात आहे. या कामासाठी केंद्र सरकारकडून एकूण १६९.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा पूल सहापदरी असून त्याची लांबी एक हजार ३२६मीटर आहे.

वाहतूक कोंडीतून सुटकेच्या प्रतीक्षेत

सबंधित काम पूर्ण होण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे; पंरतु काम चालू होण्यासाठीच एवढा उशीर होत असेल तर ते काम पूर्ण कधी होणार?

Advertisement

वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीपासून आपली कधी सुटका होईल? असे प्रश्न नागरिकांना आहेत.