पुणे – बुधवारी 31 तारखेच्या म्हणजेच चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अवघ्या देशभरात धूमधडाक्यात गणेशोत्सवाचा (Ganesh Utsav) सण साजरा होत असून, गणपतीचे हे 10 दिवस मंगलमय असतात. घराघरांत आणि मंडळांमध्ये ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते तसेच, गोड पदार्थांचा आणि बाप्पाला आवडतात म्हणून उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.

मात्र, आता उद्या दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन (Ganpati Visarjan) होणार आहे, उद्या अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे.

हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते. कुठलेही शुभ विधी किंवा कार्यक्रमापूर्वी गणपतीला वंदन केले जाते. आशा या प्रथम पूजनीय गणपतीच्या उत्सवाचा उद्या शेवटचा दिवस (Ganpati Visarjan) आहे.

भक्त 10 दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात. दरम्यान, अनंत चतुर्दशी कधी आहे आणि गणपती विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) कोणता शुभ मुहूर्त आहे याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत…

मुहूर्त :
अनंत चतुर्दशीला विसर्जन शुभ मुहूर्तावरच करावे. राहुकाळात गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) करू नये.

  • पहाटेचा मुहूर्त : 6.05 ते 10.45 पर्यंत
  • दुपारचा मुहूर्त : 12.18 ते 1.52 पर्यंत
  • सायंकाळी मुहूर्त : 5.00 ते 6.31 पर्यंत
  • रात्रीचा मुहूर्त: 9.26 ते 10.52 पर्यंत

विसर्जनाचा पूजा विधी :
विसर्जन हा बाप्पाचा निरोपाचा दिवस. बाप्पाला थाटामाटात निरोप दिला जातो. विसर्जनासाठी लाकडी पाटावर प्रथम पिवळे किंवा लाल कापड पसरून त्यावर स्वस्तिक बनवावे. त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. बाप्पाच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी.

फळे व फुले अर्पण करून मोदक मोदकाचा नैवैद्य दाखवावा. बाप्पाची आरती करावी. गणपतीची मूर्ती आणि पूजेशी संबंधित गोष्टींचे आदरपूर्वक विसर्जन (Ganpati Visarjan) करावे. यानंतर बाप्पा पुढच्या वर्षी येवो, अशी प्रार्थना करून बाप्पांना निरोप दयावा.