बकरी खरेदी करण्यासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या पुणे व कदमवाकवस्ती येथील तरुणांचा मध्य प्रदेशातील रतलाम इथं अपघात झाला.

कंटेनर, पिकअप व ट्रॅक्टर अशा तिहेरी वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जागीच ठार झाले, तर चार जण जखमी असून, गंभीर जखमी असलेल्यांना पुण्याला हलविण्याबाबत विचार सुरू आहे.

सामाजिक कार्यकर्त्यासह तिघे ठार

या भीषण अपघातात पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, जखमींवर रतलाम येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मोहन साळुंखे (वय-३८) यांच्यासह या अपघातात उमर सय्यद, अली सय्यद (रा. पुणे. वय व पूर्ण पत्ता माहीत नाही) या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल घाडगे, आकाश साळुखे (रा. दोघेही कदमवाकवस्ती ता. हवेली), गुलफाम अन्सारी, नजीर कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे चार जण या अपघातात जखमी झाले. चार जणांपैकी गुलफाम अन्सारी याची प्रकृती चिंताजणक आहे.

असा झाला अपघात

कदमवाकवस्ती येथील नवनाथ साळुखे, राहुल घाडगे, आकाश साळुंखे व त्यांचे पुण्यातील काही मित्र मागील काही वर्षांपासून मध्य प्रदेशातून बकरी खरेदी करून, त्याची विक्री पुणे व परिसरात करत होते.

रविवारीही ते सर्व बकरी खरेदी करण्यासाठी रतलाम मार्गे पुढे जात होते. रतलाम जवळ रस्त्याचे काम चालू असल्याने, वरील रस्त्यावरील वाहतूक स्थानिक पोलिसांनी एकेरी केलेली आहे.

Advertisement

रतलामजवळून जात असताना, अचानक पुढून भरधाव वेगात आलेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या छोट्या खड्डयात झुकला.

हा खड्डा चुकवण्याच्या नादात कंटेनर, थेट पिकअपवर जाऊन आदळला. त्याचवेळी पाठीमागून आलेला ट्रॅक्टरही पाठीमागून पिकअप येऊन आदळला.

 

Advertisement