Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

तृतीयपंथीयांकडून पूरग्रस्तांना देवीच्या साड्या

अनेक धार्मिक कार्यक्रमात भाविक मंडळी तृतीयपंथी समाजामार्फत देवीला साड्या अर्पण करतात. देवीला वाहिलेल्या अशा पन्नास नव्याकोऱ्या साड्या तृतीयपंथी समाजाने पूरग्रस्तांना मदत म्हणून देत मानवता धर्माचा अनोखा वस्तुपाठ घालून दिला आहे.

भूमाता संघटनेकडे मदत सूपूर्द

लोहगाव येथील भूमाता संघटनेतर्फे कोकणातील पूरग्रस्तांसाठी वस्तू रूपाने मदत गोळा करण्याचे काम सुरू होते. ही माहिती मिळाल्यानंतर महालक्ष्मी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लखन ओव्हाळ त्यांनी या मदत कार्यात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

विविध धार्मिक कार्यक्रमात देवीला वाहिलेल्या 50 नव्या साड्या घेऊन लखन ओव्हाळ आणि संजय टाकळकर, कीर्ती टाकळकर, सोनाली माने, सोनी शहा ही तृतीयपंथी मंडळी भूमाता संघटनेचे प्रशांत जगताप यांच्या घरी दाखल झाली.

Advertisement

भूमाता संघटनेकडे साड्या सुपूर्द करून संकटात सापडलेल्या कोकणवासीयांच्या मदतीसाठी त्यांनी खारीचा वाटा उचलला.

संकटवेळी ‘देण्याचा’ हा गुण

याबाबत प्रशांत जगताप म्हणाले, की तृतीयपंथी उपेक्षित समाजाकडे आपण नेहमी मागणारा समाज म्हणून पाहतो; परंतु मनाने मोठा असणारा हा समाज केवळ मानवता धर्म समोर ठेवून मदतीला पुढे आला. संकटवेळी ‘देण्याचा’ हा गुण सर्वांनी घेण्यासारखा आहे.

समाजाच्या कामी आल्याचे समाधान

लखन ओव्हाळ म्हणाले, की लोहगाव येथे मंदिरात श्रीलक्ष्मी देवीची आणि तृतीयपंथी समाजाची ओटी भरण्याची प्रथा आहे. मी देवीचा सेवक आहे. ओटी भरणात आलेल्या पन्नास नव्या साड्या जमा झाल्या होत्या.

Advertisement

कोकणावर आलेले संकट पाहता आमची मदत करण्याची इच्छा होती. त्या भावनेतून ही मदत केली. समाजाच्या कामी आल्याचे समाधान वाटले.

 

Advertisement
Leave a comment