झायडस कॅडिला’ ही भारताची अग्रणी औषधी कंपनी पुढील आठवड्यात आपल्या ‘झायकोव्ह-डी’ या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध नियामकांकडे अर्ज करणार आहे. या लसीला मंजुरी मिळाली तर ती जगातील पहिली ‘डीएनए’ आधारित लस ठरेल.

‘तसेच या माध्यमातून भारतालाही कोरोनाविरोधात चौथी लस उपलब्ध होईल. ‘झायकोव्ह-डी’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या आकडेवारीचे विश्लेषण जवळपास तयार आहे.

त्यामुळे कंपनीने पुढील आठवड्यात आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी नियामकाकडे अर्ज करणार असल्याचे सरकारला कळवले आहे,’अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेला दिली.

‘या लसीची प्रौढांसह १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांवरही चाचणी करण्यात आली आहे.

त्यामुळे अहमदाबादची झायडस कॅडिला पुढील आठवड्यात मंजुरीसाठी अर्ज करेल, तेव्हा आपल्याकडे मुलांनाही लस देता येईल काय? याविषयीची विस्तृत आकडेवारी उपलब्ध असेल,’ असे ते म्हणाले.

डीएनए-प्लाज्मिड आधारित झायकोव्ह-डी लसीचे ३ डोस असतील. ही लस २ ते ४ अंश सेल्सिअस तापमानावर साठवून ठेवता येईल. त्यामुळे तिच्यासाठी वेगळी कोल्ड चेन तयार करण्याची कोणतीही गरज भासणार नाही.

ती विद्यमान सुविधांच्या मदतीनेच देशाच्या कोणत्याही भागात पोहोचवता येईल. या लसीची पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणी जुलै २०२० मध्ये झाली होती.

‘झायडस कॅडिला’ने आतापर्यंत स्वाईन फ्लू, हेपेटायटीस-बी, रुबेला आदी विविध आजारांवर लस तयार केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित केल्यानंतर या कंपनीने लस तयार करण्याचे काम हाती घेतले होते.

यासाठी त्यांना जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यता परिषदेअंतर्गत (बीआयआरएसी) येणाऱ्या नॅशनल बायोफार्मा मिशनने (एनबीएम) मदत केली आहे.