file photo

मुंबईः राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहामध्ये देशभरातील एक हजार ८४६ स्टार्टअपनी सहभाग घेतला आहे.

विजेत्या स्टार्टअपना सरकारी काम

विजेत्या स्टार्टअपना १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश तसेच राज्यातील विविध सरकारी खात्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

आरोग्यविषयक ३२०, शेती २५२, शिक्षण २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्याची माहिती मलिक यांनी दिली.

Advertisement

तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय संस्थेला चालना देणे हा सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक अर्ज

महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहाच्या या चौथ्या आवृत्तीसाठी १२ मेपासून अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन,

पाणी व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअपनी अर्ज केले आहेत. २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून एक हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ अर्ज आले आहेत.

Advertisement

या अर्जांची तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ‘टॉप १००’ स्टार्टअपची यादी जाहीर केली जाईल.

आॅगस्टमध्ये सादरीकरण

या अव्वल १०० स्टार्टअपना ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान गुंतवणूकदार, तज्ज्ञ आणि वरिष्ठ शासकीय अधिका-यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

कोरोनामुळे सर्व सादरीकरण सत्रे ही ऑनलाइन पद्धतीने होतील. यातील विजयी २४ स्टार्टअपना त्यांच्या नवसंकल्पना सरकारच्या संबंधित विभागात वापरण्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे आदेश देण्यात येतील, असे मलिक यांनी सांगितले.

Advertisement