आठ कोटी रुपयांचा माल प्रवाशांना परत

पोलिसांनी ठरविले, तर ते फार चांगली कामगिरी करू शकतात. कल्याण रेल्वे पोलिसांनी अशीच चांगली कामगिरी करून प्रवाशांचा दुवा मिळविला आहे.

चार दशकांपासून होता चोरीचा माल पडून

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे चोरीस गेलेले सोने आणि मोबाईल या प्रकारचा एकूण आठ कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल प्रवाशांना परत करण्याची कामगिरी कल्याण रेल्वे पोलिसांनी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या १६ रेल्वे स्टेशनच्या दरम्यान १९८० पासून रेल्वे लोकल गाडया आणि मेल एक्सप्रेसमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये प्रवाशांचे मोबाईल आणि सोन्याच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या.

कल्याण रेल्वे स्टेशनकडे २८५० वस्तूंचा मुद्देमाल पडून होता. त्यात सोन्याचे दागिने, मोबाईल अन्य वस्तूंचा समावेश होता. हा मुद्देमाल प्रवाशांना परत गेला नव्हता.

चोरीस गेलेल्या वस्तू घरपोच परत

तत्कालीन पोलिस आयुक्त राजेंद्र शेनगावकर यांनी विविध गुन्ह्यात आरोपीकडून जप्त केलेला माल परत करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी २७०० मुद्देमाल प्रवाशांना परत केला आहे.

या मुद्देमालाची किंमत आठ कोटी रुपये इतकी आहे. अनेक प्रवासी हे परराज्यातील असतात. त्यांचे नाव पत्ते शोधून त्यांना बोलावून तर काही प्रवाशांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल परत करण्याची कार्यवाही केली असल्याचे शार्दूल यांनी सांगितले.

१६ स्टेशनच्या सीसीटीव्हीचे नियंत्रण कल्याणमधून

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ रेल्वे स्थानके आहेत. कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा इतकी मोठी हद्द आहे. १६ रेल्वे स्थानकात ५९२ सीसीटीव्ही आहेत. त्यापैकी २०४ सीसीटीव्ही कल्याण रेल्वे स्थानकात आहे.

सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख लवकर पटते. रेल्वेने पोलिसांच्या मदतीने संयुक्त सव्रेक्षण आहे. १६ रेल्वे स्थानकात आणखीन प्रत्येकी २६ सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव आहे.

या सर्व सीसीटीव्हीची कंट्रोलरुमची लिंक कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दिल्यास आरोपी अधिक जलद गतीने पकडणे शक्य होईल याकडे शार्दूल यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.