खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्याची परवानगी दिल्यापासून शासकीय लसीकरण मोहीम मंदावली आहे.

पुण्यात गेल्या ६५ दिवसांमध्ये खासगी रुग्णालयांत ८ लाख २८ हजार ९५० जणांनी लस घेतली आहे, तर महापालिकेने ५ लाख ३५ हजार ६६७ जणांचे लसीकरण केले आहे.

खासगी केंद्रांवर शासकीय केंद्रांपेक्षा २ लाख ९४ हजार २८३ जणांचे जास्त लसीकरण झाले आहे. त्यामुळे मोफत लसीवर अवलंबून असलेले नागरिक लसीकरणापासून वंचित रहात आहेत.

Advertisement

रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण सुरू

केंद्र सरकारने गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली. आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांच्या पुढील नागरिक, ४५ ते ५९ वयोगट आणि १८ ते ४४ वयोगट, अशा वर्गवारीत लसीकरण केले जात आहे.

सुरुवातीला केवळ शासकीय लसीकरण केंद्र सुरू होते. त्यानंतर केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लस खरेदी करण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार शहरात २१ मेपासून खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण सुरू झाले.

क्षमता जास्त; परंतु लस अनुपलब्ध

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की शहरात आतापर्यंत २३ लाख ४० हजार २२४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये ८ लाख २९ हजार डोस खासगी रुग्णालयांत दिले आहेत.

Advertisement

तुलनेने शासकीय लसीकरण जास्त आहे. महापालिका रोज किमान ५० हजार नागरिकांचे लसीकरण करू शकते. सव्वा लाख डोसची साठवणूक होऊ शकते; पण शासनाकडून अपुरा लस पुरवठा होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून लसीकरण कमी झाले आहे.

सामान्य नागरिकांना लसीची प्रतिक्षा

शहरात लसीकरणासाठी सुमारे ३३ लाख नागरिक पात्र असून त्यांच्यासाठी एकूण ६६ लाख डोसची गरज आहे.

२१ मेपासून शहरात शासकीय लसीकरणापेक्षा खासगी रुग्णालयात जवळपास तीन लाख डोसचे जास्त लसीकरण झाले आहे.

Advertisement

महापालिकेकडे २०० लसीकरण केंद्रे असली, तरी अपुऱ्या लस पुरवठ्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून त्यांना लसीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

 

Advertisement