नियाेजित मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. ५ ऑगस्टपासून ते नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला असून तिन्ही आढावा बैठका रद्द करत केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. यामुळे आघाडी सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षावर तात्पुरता पडदा पडला आहे.

राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यात जिल्हा प्रशासनाशी आढावा बैठका ठेवल्या होत्या. त्यावर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा आक्षेप घेण्यात आला होता.

Advertisement

तसेच राज्यपाल यांनी आढावा बैठका घेऊ नये, तो सरकारचा अधिकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री नाहीत. राज्यात दोन सत्ताकेंद्रे करू नका, असे अवगत करण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव यांना आदेश दिले होते.

सुधारित दौऱ्यात नांदेड जिल्हाधिकारी कार्यायालतील दुपारी ३ वाजताची, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील ४ वाजताची आणि परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी ६ वाजताची आढावा बैठक काढून टाकण्यात आली.

मात्र या दौऱ्यात राज्यपाल यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी खास वेळ राखीव ठेवली आहे. तसेच प्रशासनाबरोबरची सदर चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी शासकीय विश्रामगृह येथे होईल, असे सुधारित दौऱ्याच्या दाखवले.

Advertisement

मलिक यांचे आवाहन धुडकावले: राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने नांदेड येथील स्वा. रा. तीर्थ विद्यापीठात दोन वसतीगृहे बांधली आहेत. सध्या वसतीगृहे विद्यापीठाकडे सोपवलेली नाहीत.

त्यामुळे त्याचे उद्घाटन राज्यपाल यांनी करु नये, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. मात्र राज्यपालांनी हे आवाहन धुडकावले. सुधारित दौऱ्यातही वसतिगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम कायम ठेवण्यात आला आहे.

Advertisement