इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. केंद्र सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केंद्र सरकारला गेल्या चार महिन्यांतला दुसरा सल्ला दिला आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर शंभरीपार

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. दिल्लीतही पेट्रोलच्या किमतीनी शंभरी ओलांडली आहे.

Advertisement

दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

यामुळे जनसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातच आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्राला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

महागाईवर नियंत्रणासाठी इंधन दरवाढीला आळा घाला

इंधनदरवाढीवर दास म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेलवरही खूप कर आहे. इंधनावरील कर कमी केल्यास किमती खाली येऊ शकतात. तसंच इंधनावरील कर कमी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Advertisement

अर्थव्यवस्थेला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणायचे असून, यासाठी महागाई नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. सातत्याच्या इंधनदरवाढीमुळे महागाई वाढत चालल्याचेही ते म्हणाले.

अनिश्चितता कमी होईल

दास म्हणाले की, रिझर्व्ह बँकेला महागाईचा दर चार टक्के असणे अपेक्षित आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधील अनिश्चितता कमी होईल. तसेच विकासाला बळ मिळू शकेल.

गेल्या महिन्यात सरकारने छोट्या व्यापाऱ्यांसाठी कर्जावर हमी देण्याची घोषणा केली आहे. आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. याचा फायदा होईल, असेही दास यांनी सांगितले.

Advertisement

जागतिक दरवाढीचा परिणाम

जागतिक स्तरावर कच्च्या तेल्यांच्या वाढत्या किमतीचे थेट परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होत आहे.

अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम भारतासह सर्व अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारताचा परकीय चलन साठा ६०९ अब्ज डॉलर्स आहे, असे दास यांनी म्हटले आहे.

 

Advertisement