राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष काही थांबायला तयार नाही. दोन्हींतील पत्रव्यवहार म्हणजे एक शीतयुद्ध असतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने 23 जूनला राजभवनात एक निवेदन दिले होते.

त्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना विचारणा केली. त्या पत्राबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

तीन प्रश्नांबाबत विचारणा

कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रातील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता राज्यपालांनी वेगळ्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. या पत्रात तीन महत्त्वाच्या प्रश्नांची विचारणा करण्यात आली.

Advertisement

राज्यपालांचे कार्यालय भाजपचे कार्यालयः पटोले

“राज्यपाल कोश्यारी यांना भाजपच्या नेतेमंडळींनी निवेदन दिले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्याना काही प्रश्न विचारण्यात आले. यावरून असं दिसतं, की राज्यपालांचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे.

प्रथमच देशात असे झाले आहे, की एखाद्या राज्याचे राज्यपाल हे भाजप किंवा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे, त्यामुळे आम्ही त्या पदाचा सन्मानच करतो.

राज्यपालांचे काम काय असते, हे मला वेगळं सांगायची गरज नाही. राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावली जात आहे असं दाखवलं जात असलं, तरी यामागं सारं काही सांगण्याचं काम हे भाजपच करत आहे”, अशा शब्दात पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपला टोला लगावला.

Advertisement

राज्यपाल कोश्यारी यांनी पत्र पाठवत, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, अधिवेशनाचा कालावधी आणि ओबीसी आरक्षणाबद्दल सरकारला विचारणा केली आहे.

उपरोक्त विषय अत्यंत महत्वाचे असल्यामुळे याबाबत आपण कार्यवाही करावी व मला त्याबाबत माहिती द्यावी, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Advertisement