Pune : पुणे जिल्हा परिषद(Pune Zilha Parishad) आणि भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त आहे. पुणे विभागातही याची अंमलबजावणी करावी आणि अभियानाच्या माध्यमातून आपले गाव कोविडमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील यात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले(Ajit Pawar).

या अभियानात ज्या ग्रामपंचायती उत्कृष्ट काम करतील त्यांना पहिलं बक्षीस 50 लाख, दुसरं 25 लाख आणि तिसरं बक्षीस 15 लाखाचं देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

आज शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या कोरोनामुळे आपले भरपूर नुकसान झाले आहे. या कोरोना लवकर हरवण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर पुणे जिल्ह्या परिषद आणि बिजेएस’च्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येणार आहे. संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘बिजेएस’च्या सहकार्याने पुण्यातील काही गावात राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याने तो राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

महिलांनी पुढाकार घ्यावा
आज बहुतांश ठिकाणी महिला, आणि नव युकांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आहे. त्यांनी ठरवले तर ते कोणतेही अभियान यशस्वी राबवतील. महिलांनी आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुश्रीफांशी चर्चा करू
कोविडमुक्त 44 गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोविडमुक्त गाव मोहीम राज्यात सुरू करण्याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कृती दलाची स्थापना
प्रास्ताविकात शांतीलाल मुथा यांनी मोहिमेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यातील 550 गावांनी गाव कोविडमुक्त करण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली आहे. त्यांना बिजेएसतर्फे ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावात ही मोहीम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.