file photo

पुणेः पुणे ग्रामीण पोलिस दलाची गुन्हेगाराविरोधातील मोहीम सुरू आहे. अवैध धंदेवाले, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रकार दररोज सुरू आहेत.

सापळा रचून गावठी पिस्तूलासह गुन्हेगाराला अटक

अंमली पदार्थ विक्री करणे, मारहाण करून गंभीर दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून खडकवासला येथून गावठी पिस्तूल व एका जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. शिवम आनंत बरिदे (वय.21, रा. खडकवासला ता. हवेली जि. पुणे) असे या सराईताचे नाव आहे.

खब-यामार्फत मिळाली होती माहिती

सिंहगड परिसरात गस्त घालत असताना पोलिस नाईक किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना शिवम बरिदे या सराईत गुन्हेगाराकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली.

Advertisement

मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर खडकवासला परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून बरिदे यास ताब्यात घेतले. त्या वेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले. आरोपी शिवम बरिदे यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवेली पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.