मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ (har ghar tiranga) या अभियानाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच असे प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे अभियान होत आहे. राज्यातील सर्व घरांवर दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकावून सर्वांनी यामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी नुकतंच केलं आहे.

विनोद तावडे (Vinod Tawde) म्हणाले की, १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरातल्या २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. हा जनतेचा कार्यक्रम आहे.

लोक स्वत: पुढाकार घेत तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी आजपासूनच घरावर तिरंगा लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा हे अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

ते म्हणाले की, आम्ही देशातल्या युवकांना सांगू इच्छितो की, हर घर तिरंगा हे तुमचे अभियान आहे. या अभियानासोबत जोडून आपल्या घरी तिरंगा फडकावून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर फोटो अपलोड करावा.

तिरंगा यात्रेमुळे देशाच्या तरूणांमध्ये देशभक्ती जागृत होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला सर्व क्षेत्रामध्ये सर्वोच्च पातळीवर अग्रणी ठेवण्याचा संकल्प करण्याचे हे वर्ष आहे.

त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभरात ९ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘हर घर तिरंगा अभियान’ राबवले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या अभियानामुळे सर्व भारतीय हे एका धाग्यात विणले जात आहेत. जे.पी. नड्डा व अमित शहा यांनी भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ‘हर घर अभियाना’ विषयीच्या मार्गदर्शन सुचना दिल्या होत्या.

९ ऑगस्ट २०२२ ते ११ ऑगस्ट २०२२ दरम्यान अमृत महोत्सवी वर्षा संबंधी जनजागृती करण्यासाठी, देशप्रेमाची भावना वाढीस लागावी यासाठी तिरंगा यात्रा काढणे, ठिकठिकाणी फलक लावणे यासारखे उपक्रम राबवले.

देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यांमध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

११ ऑगस्ट ते १३ ऑगस्टच्या कालावधीमध्ये प्रत्येक वॉर्ड किंवा गावांमध्ये ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन आणि ‘वंदे मातरम’ या गीतासह प्रभात फेरी काढण्यात येत आहे.

आज देशातल्या लाखो गावांमध्ये प्रभात फेऱ्या काढल्या होत्या. तर ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशभरात महापुरूषांच्या स्मारकावर स्वच्छता अभियान राबवले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.