भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा विवाह होणार असल्याची माहिती मिळतेय.

हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. त्याची अधिकृत माहिती आज मिळाली आहे.

हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे भेट दिली. त्यावेळी 28 तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे.

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून ते पेशाने वकील आहेत. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि एक वर्ष हार्वर्डमध्येही शिक्षण घेतले आहे.

इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना अंकिता आणि निहार यांची ओळख झाली होती. नंतरच्या काळात अंकिता पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला होता.

Advertisement

बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या 2019 साली झालेल्या निवडणुकीत अंकिता पाटील विजयी झाल्या होत्या. ही निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकल्यामुळे अंकिता पाटील चर्चेत आल्या होत्या. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

तर निहार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यांचे वडील बिंदूमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार यांचे सख्खे काका तर राज हे चुलतकाका आहेत. या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत.

हर्षवर्धन पाटील हे मंगळवारी राजकीय नेत्यांना विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन त्यांना विवाहसोहळ्याचे निमंत्रण दिले. शिवतीर्थावर ते आपली कन्या आणि चिरंजीवासह आले होते. अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.

Advertisement