Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

हर्षवर्धन पाटलांच्या मुलाचा शिक्षकाशी वाद

राजकीय नेते जाहीर वाद घालायचे टाळतात. त्यामुळे त्याची चर्चा होत असते. एकांतात मात्र ते कानउघाडणी करतात. वाद घालतात; परंतु समाज माध्यमांतून आता हे वाद जगजाहीर व्हायला लागले आहेत.

संभाषणाची आॅडिपो क्लिप व्हायरल

इंदापूर तालुक्यात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील आणि संबंधित संस्थेतील एका ज्येष्ठ शिक्षकामध्ये झालेल्या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या दोघांमध्ये झालेल्या एका संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या ‘सोशल मीडिया’वर प्रचंड व्हायरल झाली आहे. तालुक्यात खळबळ उडाली आहे.

भरणे यांचा व्हाॅटस्‌ ॲपचा फोटो वादाला कारण

पाटील यांच्याशी संबंधित असणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये संबंधित शिक्षक सेवा बजावत आहेत. शिक्षण संस्थेशी निगडित असणाऱ्या एका व्हाॅट्सॲप ग्रुपवर इंदापूरचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक फोटो संबंधित शिक्षकाने पोस्ट केला, त्यामुळे वाद निर्माण झाल्याचे या ऑडिओ क्लिपवरून स्पष्ट होत आहे.

राजवर्धन यांनी घातला वाद

संस्थेशी निगडित असणाऱ्या ग्रुपवर फोटो का टाकला? याचा जाब विचारण्यासाठी राजवर्धन पाटील यांनी या शिक्षकाला आपल्या मोबाईलवरून संपर्क साधला.

दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक खडाजंगी संभाषणाचे सर्व रेकॉर्डिंग या शिक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये केले. त्यानंतर ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली.

रागात बोलले, तरी आदरातिर्थी उल्लेख

या ऑडिओ क्लिपमध्ये राजवर्धन पाटील हे रागात बोलले असले, तरी समोरील व्यक्तीला त्यांनी एकही शब्द एकेरी वापरला नाही.

ज्या संस्थेत आपण काम करतो त्यांच्याशी प्रामाणिक राहा, असे सांगत आहेत; मात्र समोरील व्यक्तीने पाटील यांना नातवाच्या वयाचे संबोधत एकेरी संवाद साधला आहे. तसेच शिक्षक संयमाने न बोलता राजवर्धन यांना बोलायला भाग पाडल्याची चर्चा आहे.

दोन्ही बाजूंनी समर्थन

संस्थेतील कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करणे योग्य नाही, असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. तर, ज्या शिक्षकांना राजवर्धन यांनी जाब विचारला, त्या शिक्षकाने असभ्य भाषेत वर्तन केले, हे शिक्षकी पेशाला अशोभनीय आहे, अशा शब्दांत पाटील यांना पाठबळ दिले जात आहे.

Leave a comment