राज्य सरकारने १५ तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला आणि त्याबाबतचा अध्यादेश काढला असला, तरी आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र इतक्यात शाळा सुरू करायला अनुकूल नाहीत. वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास मात्र त्यांची हरकत नाही.
विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घ्या
राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसली, तर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन शाळा सुरू कराव्यात, का यावर चर्चा करण्यात येत आहे; मात्र टोपे यांनी सध्या शाळा सुरू करू नयेत असं म्हटलं आहे.
सध्या 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही, असे ते म्हणाले आहेत.
लहान मुलांना कोरोनाच्याचा धोका
नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झाल्यामुळे सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याच कारणामुळे आता राज्यातील शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी काही पालकांकडून केली जात आहे.
राज्यात शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले होते.
या सर्वेक्षणात अनेक पालकांनी शाळा सुरू कराव्यात असे दर्शवले होते; मात्र टोपे यांनी सध्याच शाळा सुरू करणे योग्य होणार नसल्याचे म्हटले आहे.
१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण
लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असं मत टोपे यांनी व्यक्त केलं आहे.
18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचेही टोपे यांचे मत आहे.
निर्बंध कडक ठेवा किंवा सूट द्या
कोरोना महामारीच्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी टोपे यांनी चर्चा केली. निर्बंध एक तर कडक ठेवले पाहिजेत नाहीतर सूटच दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.